Google
 

Saturday, February 07, 2009

चिंब पावसानं रानं झालं आबादानी
झाकू कशी पाठीवरली, चांदणं गोंदणी

झाकू नको कमळनबाई, एकांताच्या कोनी
रूपखनी अंगावरली, सखे लावण्याची खाणी

राया तुझे हात माझ्या हातात गुंफूनी
उन्हात चांदणं आलं लाज पांघरूनी

तुझ्या डोळ्यांच्या सांदीत, सावल्यांची राणी
पान्यामंदी झिम्मा धरं, आभाळ अस्मानी

अंगावरी थरथर उठली झिम्मड भिजल्यावानी
सांगता ना येई काही साजणा बोलांनी
गीत - ना. धो. महानोर
संगीत - पं. हृदयनाथ मंगेशकर
स्वर - लता मंगेशकर, सुरेश वाडकर
चित्रपट - सर्जा (१९८७)
काळ्या मातीत मातीत तिफन चालते,
तिफन चालते, तिफन चालते
ईज थयथय नाचते ढग ढोल वाजवितो,
ढोल वाजवितो, ढग ढोल वाजवितो

सदाशिव हाकारतो नंदी बैलाच्या जोडीला
संग पारवती चाले ओटी बांधून पोटाला
सरीवर सरी येती माती न्हाती धुती होते
कस्तुरीच्या सुवासानं भूल जिवाला पडते
भूल जिवाला पडते वाट राघूची पाहते
राघू तिफन हाकतो मैना वाटुली पाहते

सर्जा रं माझ्या ढवळ्या रं माझ्या पवळ्या रं माझ्या

झोळी झाडाला टांगून राबराबते माऊली
तिथं झोळीतल्या जिवा व्हते पारखी साऊली
अभिषेकात घामाच्या आसं देवाचं पूजन
पिकं हालती डोलती जनू करती भजन
गव्हा जोंधळ्यात तवा सोनं चांदी लकाकते
जशी चांदी लकाकते कपाशी फुलते

चालं ऊनपावसाचा पाठशिवणीचा खेळ
लोनी पायाला वाटती मऊ भिजली ढेकळं
काळ्या ढेकळात डोळा हिरवं सपान पाहतो
डोळा सपान पाहतो काट पायांत रुततो
काटा पायांत रुतता लाल रगात सांडतं
लाल रगात सांडतं हिरवं सपान फुलतं
गीत - विठ्ठल वाघ
संगीत - अनिल-अरुण
स्वर - अनुराधा पौडवाल, सुरेश वाडकर
चित्रपट - अरे संसार संसार (१९८१)
नाविका रे, वारा वाहे रे,
डौलाने हाक जरा आज नाव रे
सांजवेळ झाली आता पैल माझे गाव रे

आषाढाचे दिसं गेले, श्रावणाचा मास सरे, भादवा आला
माझा राऊ मनामंदी बोलुनि गेला
धाव घेई बघ माझे मन, नाही त्याला ठाव रे

नवा साज ल्यायले मी, गौरीवाणी सजल्ये मी, चांदवा ल्याला
माझा जीवू उरामंदी फुलुनी आला
नाचते रे बघ माझे तन, संग त्याचा भाव रे
गीत - अशोकजी परांजपे
संगीत - अशोक पत्की
स्वर - सुमन कल्याणपूर
प्रीतीचं झुळझुळ पाणी, वाऱ्याची मंजुळ गाणी
रोमांची सर्वांगी गेले मी न्हाऊनी

हा जीव वेडा होई थोडा थोडा, वेड्या मनाचा बेफाम घोडा
दौडत आला सखे तुझा बंदा, चल प्रेमाचा रंगू दे विडा
साजणा तुझी मी कामिनी

मी धुंद झाले मन मोर डोले, पिसाऱ्यातून हे खुणावित डोळे
डोळ्यांत जाळे - खुळी मीच झाले, स्वप्न फुलोरा मनात झुले
मी तुझा हंस ग मानिनी

ही तान नाचे आसावरीची, मांडी नव्हे ही उशी सावरीची
सोबत लाभे मला ही परीची, किती स्वाद घेऊ सरेना रुची
सजना वेळ का मिलनी
गीत - मुरलीधर गोडे
संगीत - ऋषीराज
स्वर - उषा मंगेशकर, शैलेंद्र सींग
चित्रपट - बन्याबापू (१९७७)
शूर अम्ही सरदार अम्हला काय कुनाची भीती ?
देव, देश अन्‌ धर्मापायी प्राण घेतलं हाती !

आईच्या गर्भात उमगली झुंजाराची रीत
तलवारीशी लगिन लागलं जडली येडी प्रीत
लाख संकटं झेलुन घेइल अशी पहाडी छाती !

झुंजावं वा कटुन मरावं हेच अम्हाला ठावं
लढुन मरावं मरुन जगावं हेच अम्हाला ठावं
देशापायी सारी इसरू माया ममता नाती !
गीत - शांता शेळके
संगीत - आनंदघन
स्वर - पं. हृदयनाथ मंगेशकर
चित्रपट - मराठा तितुका मेळवावा (१९६४)
राग - हंसध्वनी (नादवेध)
शत जन्म शोधिताना । शत आर्ति व्यर्थ झाल्या ।
शत सूर्य मालिकांच्या । दीपावली विझाल्या ॥

तेंव्हा पडे प्रियासी । क्षण एक आज गाठी ।
सुख साधना युगांची । सिद्धीस अंति गाठी ॥

हा हाय जो न जाई । मिठी घालु मी उठोनी ।
क्षण तो क्षणांत गेला । सखि हातचा सुटोनी ॥
गीत - स्वातंत्र्यवीर सावरकर
संगीत - वझेबुवा
स्वर - पं. वसंतराव देशपांडे
नाटक - सन्यस्तखड्ग (१९३१)
राग - भैरवी (मूळ संहिता)
चाल - आखोंने तेरे गममें
छेडियल्या तारा
हे गीत येईना जुळून !
फुलते ना फूल तोच
जाय पाकळी गळून !

आकारून येत काहि
विरते निमिषात तेहि
स्वप्नचित्र पुसुनि जाय
रंग रंग ओघळून !

क्षितिजाच्या पार दूर
मृगजळास येइ पूर
लसलसते अंकुर हे
येथ चालले जळून !
गीत - शांता शेळके
संगीत - पं. जितेंद्र अभिषेकी
स्वर - पं. वसंतराव देशपांडे
नाटक - हे बंध रेशमाचे (१९७२)
राग - मिश्र मांड (नादवेध)
गुलजार नार ही मधुबाला ॥
तनुलतेवर गेंद फुलांचे यौवन ये बहराला ॥

गोड गोड बोलूनी खोडकर ओढ लावि हृदयाला
भ्रुधनुवरती सज्ज करोनी नयनांची शरमाला
चंचल नयना सहज विंधिते चंचल हृदयाला
गीत - विद्याधर गोखले
संगीत - पं. राम मराठे
स्वर - पं. वसंतराव देशपांडे
नाटक - मेघमल्हार (१९६७)
राग - गौड मल्हार (नादवेध)
लहानपण देगा देवा ।
मुंगी साखरेचा रवा ॥१॥

ऐरावत रत्न थोर ।
त्यासी अंकुशाचा मार ॥२॥

जया अंगी मोठेपण ।
तया यातना कठीण ॥३॥

तुका म्हणे बरवे जाण ।
व्हावे लहानाहून लहान ॥४॥

महापूरे झाडे जाती ।
तेथे लव्हाळ वाचती ॥५॥
रचना - संत तुकाराम
संगीत -
स्वर - कुमार गंधर्व
हवास तू, हवास तू, हवास मज तू, हवास तू
प्रिया नाचते आनंदाने दूर उभा का उदास तू ?

मदनासम हे रूप देखणे, शब्दाविण हे मुक्त बोलणे
तुझ्यापुढे मज गगन ठेंगणे, ज्योती मी अन्‌ प्रकाश तू

या तेजस्वी डोळ्यांमधुनी, भरदिवसा हो रात चांदणी
मुखचंद्राच्या कलाकलांनी, हासविणारा सुहास तू

तारुण्याच्या झाडावरती, मोहक हो‍उनी बसली प्रीती
या प्रीतीच्या पूर्तीसाठी, करशील का रे प्रयास तू
गीत - जगदीश खेबुडकर
संगीत - सुधीर फडके
स्वर - आशा भोसले
चित्रपट - आम्ही जातो आमुच्या गावा (१९७२)
रुपेरी वाळूत माडांच्या बनात ये ना
बनात ये ना, जवळ घे ना
चंदेरी चाहूल, लावीत प्रीतीत ये ना
प्रीतीत ये ना, जवळ घे ना

बेधुंद आज आसमंत सारा
कुंजात गात मंद धुंद वारा
दाटे उरी प्रिया तुझा इशारा
देहावरी फुले असा शहारा
तुझा इशारा... असा शहारा

लाजेत आज ही फुले नहाती
गाली अनार प्रीतगीत गाती
तू ये निशा अशी करी पुकारा
दे ये प्रिया मला तुझा निवारा
तुझा निवारा... तुझा निवारा
गीत - शांताराम नांदगावकर
संगीत - अनिल-अरुण
स्वर - आशा भोसले
ऊ कशी प्रिया, सवे तुझ्या, अशा क्षणांना

सांजसकाळी, कातरवेळी, सागरकाठी, वाळूवरी, सांग ना
कशी प्रिया, सांग ना

काजळकाळी, रात निरळी, मी तर भोळी, येऊ कशी, सांग ना ?
कशी प्रिया, सांग ना

येते तुझ्या सवे, येते? ना ना ना
येऊ कशी प्रिया, सवे तुझ्या, अशा क्षणांना
गीत - शांताराम नांदगावकर
संगीत - अनिल-अरुण
स्वर - आशा भोसले
माझिया मना, जरा थांब ना
पाऊली तुझ्या माझिया खुणा
तुझे धावणे अन्‌ मला वेदना

माझिया मना, जरा बोलना
ओळखू कसे मी हे तुझे ऋतू
एकटी न मी सोबतीस तू
ओळखू कशा मी तुझ्या भावना

माझिया मना, जरा ऐकना
सांजवेळ ही तुझे चालणे
रात्र ही सुनी तुझे बोलणे
उषःकाल आहे नवी कल्पना
गीत - सौमित्र
संगीत - श्रीधर फडके
स्वर - आशा भोसले
चांदण्यात फिरताना माझा धरलास हात !
सखया रे, आवर ही सावर ही चांदरात !

निजलेल्या गावातुन आले मी एकटीच;
दूर दिवे कळलावे पडले मागे कधीच;
ह्या इथल्या तरुछाया पण सारे जाणतात !

सांग कशी तुजविनाच पार करू पुनवपूर ?
तुज वारा छळवादी अन्‌ हे तारे फितूर !
श्वास तुझा मालकंस ! स्पर्श तुझा पारिजात !

जाऊ चल परत गडे, जागले न घर अजून,
पण माझी तुळस तिथे गेली रे हिरमुसून
तुझिया नयनात चंद्र ! माझ्या हृदयी प्रभात !
गीत - सुरेश भट
संगीत - पं. हृदयनाथ मंगेशकर
स्वर - आशा भोसले
गोरी गोरीपान, फुलासारखी छान
दादा, मला एक वहिनी आण

गोऱ्या गोऱ्या वहिनीची अंधाराची साडी
अंधाराच्या साडीवर चांदण्यांची खडी
चांदण्यांच्या पदराला बिजलीचा बाण !

वहिनीला आणायाला चांदोबाची गाडी
चांदोबाच्या गाडीला हरणांची जोडी
हरणांची गाडी तुडवी गुलाबाचे रान !

वहिनीशी गट्टि होता तुला दोन थापा
तुला दोन थापा, तिला साखरेचा पापा
बाहुल्यांच्या परी होऊ दोघी आम्ही सान !
गीत - ग. दि. माडगूळकर
संगीत - श्रीनिवास खळे
स्वर - आशा भोसले
केव्हा तरी पहाटे उलटून रात्र गेली
मिटले चुकून डोळे हरवून रात्र गेली

कळले मला न केव्हा सुटली मिठी जराशी
कळले मला न केव्हा निसटून रात्र गेली

सांगू तरी कसे मी वय कोवळे उन्हाचे ?
उसवून श्वास माझा फसवून रात्र गेली !

उरले उरात काही आवाज चांदण्यांचे .....
आकाश तारकांचे, उचलून रात्र गेली !

स्मरल्या मला न तेव्हा माझ्याच गीतपंक्ती
मग ओळ शेवटची सुचवून रात्र गेली !

आता कुशीत नाही ती चंद्रकोर माझी .....
( हलकेच कूस माझी बदलून रात्र गेली )

अजुनी सुगंध येई दुलईस मोगऱ्याचा .....
गजरा कसा फुलांचा विसरुन रात्र गेली ?
गीत - सुरेश भट
संगीत - पं. हृदयनाथ मंगेशकर
स्वर - आशा भोसले
चित्रपट - निवडूंग (१९८९)
राग - दुर्गा (नादवेध)
का रे दुरावा, का रे अबोला
अपराध माझा, असा काय झाला

नीज येत नाही, मला एकटीला
कुणी ना विचारी, धरी हनुवटीला
मान वळविसी तू, वेगळ्या दिशेला

तुझ्या वाचूनी ही, रात जात नाही
जवळी जरा ये, हळू बोल काही
हात चांदण्याचा, घेई उशाला

रात जागवावी, असे आज वाटे
तृप्त झोप यावी, पहाटे पहाटे
नको जागणे हे, नको स्वप्नमाला
गीत - ग. दि. माडगूळकर
संगीत - सुधीर फडके
स्वर - आशा भोसले
चित्रपट - मुंबईचा जावई (१९७०)
राग - यमन (नादवेध)
ने मजसी ने परत मातृभूमीला
सागरा, प्राण तळमळला

भूमातेच्या चरणतला तुज धूता
मी नित्य पाहिला होता
मज वदलासी अन्य देशि चल जाऊ
सृष्टिची विविधता पाहू
त‍इं जननीहृद्‌ विरहशंकितहि झाले
परि तुवां वचन तिज दिधले
मार्गज्ञ स्वये मीच पृष्ठि वाहीन
त्वरित या परत आणीन
विश्वसलो या तव वचनी मी
जगद्‌नुभवयोगे बनुनी मी
तव अधिक शक्ती उद्धरणी मी
येईन त्वरे, कथुनि सोडिले तिजला
सागरा, प्राण तळमळला

शुक पंजरि वा हरिण शिरावा पाशी
ही फसगत झाली तैशी
भूविरह कसा सतत साहु या पुढती
दशदिशा तमोमय होती
गुणसुमने मी वेचियली या भावे
की तिने सुगंधा घ्यावे
जरि उद्धरणी, व्यय न तिच्या हो साचा
हा व्यर्थ भार विद्येचा
ती आम्रवृक्षवत्सलता, रे
नवकुसुमयुता त्या सुलता, रे
तो बाल गुलाबहि आता, रे
फुलबाग मला, हाय, पारखा झाला
सागरा, प्राण तळमळला

नभि नक्षत्रे बहुत, एक परि प्यारा
मज भरतभूमिचा तारा
प्रासाद इथे भव्य, परी मज भारी
आईची झोपडी प्यारी
तिजवीण नको राज्य, मज प्रिया साचा
वनवास तिच्या जरि वनिचा
भुलविणे व्यर्थ हे आता, रे
बहु जिवलग गमते चित्ता, रे
तुज सरित्पते जी सरिता, रे
त्वद्‍अविरहाची शपथ घालितो तुजला
सागरा, प्राण तळमळला

या फेनमिषें हससि निर्दया कैसा
का वचन भंगिसी ऐसा ?
त्वत्स्वामित्वा सांप्रत जी मिरवीते
भिउनि का आंग्लभूमीते
मन्मातेला अबला म्हणुनि फसवीसी
मज विवासनाते देशी
तरि आंग्लभूमी भयभीता, रे
अबला न माझि ही माता, रे
कथिल हे अगस्तिस आता, रे
जो आचमनी एक क्षणी तुज प्याला
सागरा, प्राण तळमळला
गीत - स्वातंत्रयवीर सावरकर
संगीत - पं. हृदयनाथ मंगेशकर
स्वर - लता, उषा, मीना, हृदयनाथ (मंगेशकर)
अशी पाखरे येती आणिक स्मृती ठेवुनी जाती
दोन दिसांची रंगत संगत दोन दिसांची नाती

चंद्र कोवळा पहिलावहिला
झाडामागे उभा राहिला
जरा लाजुनी जाय उजळुनी काळोखाच्या राती

फुलून येता फूल बोलले
मी मरणावर हृदय तोलले
नव्हते नंतर परी निरंतर गंधित झाली माती

हात एक तो हळु थरथरला
पाठीवर मायेने फिरला
देवघरातिल समईमधुनी अजून जळती वाती

कुठे कुणाच्या घडल्या भेटी
गीत एक मोहरले ओठी
त्या जुळल्या हृदयांची गाथा सूर अजुनही गाती
गीत - मंगेश पाडगावकर
संगीत - यशवंत देव
स्वर - सुधीर फडके
शुक्रतारा, मंद वारा, चांदणे पाण्यातुनी
चंद्र आहे, स्वप्न वाहे धुंद या गाण्यातुनी
आज तू डोळ्यांत माझ्या मिसळुनी डोळे पहा
तू अशी जवळी रहा

मी कशी शब्दात सांगू भावना माझ्या तुला ?
तू तुझ्या समजून घे रे लाजणाऱ्या या फुला
अंतरीचा गंध माझ्या आज तू पवना वहा
तू असा जवळी रहा

लाजऱ्या माझ्या फुला रे गंध हा बिलगे जिवा
अंतरीच्या स्पंदनाने अन्‌ थरारे ही हवा
भारलेल्या या स्वरांनी भारलेला जन्म हा
तू अशी जवळी रहा

शोधिले स्वप्नात मी ते ये करी जागेपणी
दाटुनी आलास तू रे आज माझ्या लोचनी
वाकला फांदीपरी आता फुलांनी जीव हा
तू असा जवळी रहा
गीत - मंगेश पाडगावकर
संगीत - श्रीनिवास खळे
स्वर - सुधा मलहोत्रा, अरुण दाते
राग - यमनकल्याण (नादवेध)
दिवस तुझे हे फुलायचे
झोपाळ्यावाचून झुलायचे

स्वप्नात गुंगत जाणे
वाटेत भेटते गाणे
गाण्यात हृदय झुरायचे

मोजावी नभाची खोली
घालावी शपथ ओली
श्वासात चांदणे भरायचे

थरारे कोवळी तार
सोसेना सुरांचा भार
फुलांनी जखमी करायचे

माझ्या या घरच्यापाशी
थांब तू गडे जराशी
पापण्या मिटून भुलायचे
गीत - मंगेश पाडगावकर
संगीत - यशवंत देव
स्वर - अरुण दाते
रात्रीस खेळ चाले, या गूढ चांदण्यांचा
संपेल ना कधीही, हा खेळ सावल्यांचा

हा चंद्र ना स्वयंभू, रवी तेज वाहतो हा
ग्रहणात सावल्यांचा अभिशाप भोगतो हा
प्रीतीस होई साक्षी, हा दूत चांदण्यांचा

आभास सावली हा, असतो खरा प्रकाश
जे सत्य भासती ते, असती नितांत भास
हसतात सावलीला, हा दोष आंधळ्यांचा

या साजीऱ्या क्षणाला, का आसवे दिठीत
मिटतील सर्व शंका, उबदार या मिठीत
गवसेल सूर आपुल्या, या धुंद जीवनाचा
गीत - सुधीर मोघे
संगीत - पं. हृदयनाथ मंगेशकर
स्वर - महेंद्र कपूर
चित्रपट - हा खेळ सावल्यांचा (१९७६)
फिटे अंधाराचे जाळे
झाले मोकळे आकाश
दरीखोऱ्यांतून वाहे
एक प्रकाश प्रकाश

रान जागे झाले सारे
पायवाटा जाग्या झाल्या
सूर्य जन्मता डोंगरी
संगे जागल्या साऊल्या
एक अनोखे लावण्य
आले भरास भरास

दंव पिऊन नवेली
झाली गवताची पाती
गाणी जुनीच नव्याने
आली पाखरांच्या ओठी
क्षणापूर्वीचे पालटे
जग उदास उदास

झाला आजचा प्रकाश
जुना कालचा काळोख
चांदण्याला किरणांचा
सोनसळी अभिषेक
सारे रोजचे तरीही
नवा सुवास सुवास

साऱ्या रंगावर आली
एक सोनेरीशी झाक
भिडे काळजाला थेट
निळ्या क्षितिजाची हाक
तुझ्या नसण्याची कळ
गेली तळास तळास


गीत - सुधीर मोघे
संगीत - श्रीधर फडके
स्वर - आशा भोसले, सुधीर फडके
चित्रपट - लक्ष्मीची पाऊले (१९८२)

Saturday, January 31, 2009

व.पु.KaaLe


स्वप्न

स्वप्न संपल की सत्य बोचु लागतं उदबत्या जळुन गेल्या तर मागे राखेचा सडा ऊरतो . राखेला सुंगंध नसतो. स्वप्नाला सुत्र नसत. तरी मी त्याला विचारलं "स्वप्नांवर माणुस जगतो का रे ?" तो म्हणाला "नाही ! स्वप्नांवरच माणुस झोपतो, रमतो. पण जाग येईपर्यंत ! जागेपणीही स्वप्नच ऊराशी बाळगली तर परत झोपण्याची वेळ येते माणसावर "

"मी बुवा स्वप्नांवरच जगतो. स्वप्नांचा आणि सुंगंधाचा फ़ार जवळचा संबंध असतो"
"बरोबर आहे, शेवटी दोन्हीची राख होते"

___________________________________________________________________

एकाकी
एकाकीपण वेगळं , एकांत वेगळा . परीसराचं मौन म्हणजे एकांत .आणि परिवारात असतानाही पोरकं वाटण हे एकाकीपण . एकाकी वाटलं तर मनसोक्त रडावं.

अश्रु म्हणजे दुबळेपणा नाही। पावसाळी ढग जसे बरसल्या वर हलके होतात. आणि दिसेनासे होतात, तसा माणुसही हलका होतो. आकाशाजवळ पोहोचतो. असंच कोणतं तरी दुःख पार केल्यावर तुकाराम " तुका आकाशायेवढा " असं लिहुन गेला असेल.

__________________________________________________________________

सगळे कागद सारखेच...त्याला अंहकार चिकटला की त्याचे Certificate होते.....

__________________________________________________________________

गगनभरारी

कबुतराला गरुडाचे पंख लावता येतीलही, पण गगनभरारीचं वेड रक्तातच असावं लागतं ... कारण आकाशाची ओढ दत्तक घेता येत नाही. आकाशात जेव्हा ऊपग्रह सोडतात तेव्हा गुरुत्वाकर्शणाच्या बाहेर पिटाळुन लावे पर्यंत संघर्ष असतो

त्याने गती घेतली की उरलेला प्रवास आपोआपच होतो । असंच माणसाचं आहे.......समाजात एक विशिष्ट ऊंची गाठे प्रर्यंत सगळा संघर्ष असतो. पण एकदा अपेक्षित ऊंचीवर पोहोचलात की आयुष्यात्ल्या अनेक समस्या ती ऊंचीच सोडावाते

_________________________________________________________________

वपूर्झा
एकदा केव्हातरी शांतपणे बसावं आणि वयानुसार आपण काय काय गोष्टी सोडल्या ह्याचा आढावा मग लक्षात येतं, की आपण गाभुळलेली चिंच बरयाच वर्षात खाल्ली नाही, जत्रेत मिळणारी पत्र्याची शिट्टी वाजवलेली नाही. चटक्याच्या बिया घासुन चटके द्यावेत असं आता वाटत नाही, कारण परीस्थितीचे चटके सोसतानाच पुरेवाट झालेली असते. कॅलिडोस्कोप बघितलेला नाही. सर्कशितला जोकर आता आपलं मन रिझवु शकत नाही. तसंच कापसाची म्हातारी पण पकडण्याचा चार्मही आता राहीलेला नाही. कापसाच्या त्या म्हातारीने उडता उडता आपला "बाळपणीचा काळ सुखाचा " स्वत: बरोबर कधी नेला ते कळलंच नाही. त्या ऊडणारया म्हातारीने सर्व आनंद नेले. त्याच्या बदल्यात तिच वार्धक्य तिने आपल्याला दिलं. म्हणुन ती अजुनही ऊडु शकते. आपण जमिनीवरच आहोत

चार लोकमान्य टिळक वा चार सावरकर उत्पन्न होऊन राष्ट्रोत्थानाचे स्वप्न पुरे होणार नाही आणि समाज जागृतीचा पुरेसा प्रकाशही पडणार नाही.पुरेसा प्रकाश नि प्रभाव उत्पन्न होऊन राष्ट्रोत्थान होण्यासाठी तुम्हाला तुमच्या आयुष्याच्या मशाली पेटवल्या पाहिजेत आणि आपल्या कार्याचे नि जीवनाचे तेल ओतले पाहिजे.

- स्वातंत्र्यवीर सावरकर